सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा गुन्हे उघडकीस

सात तोळ्याच्या दागिन्यांसह साडेआकरा लाखाचा मुद्देमाल जप्त

Jalna Nayak    06-Aug-2026
Total Views |

जालना शहरातील महिलांना लक्ष्य करून सोनसाखळी हिसकावून पोबारा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कदीम जालना पोलिसांना यश आले आहे.जालना : जालना शहरातील महिलांना लक्ष्य करून सोनसाखळी हिसकावून पोबारा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कदीम जालना पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत तीन घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणत तीस तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधु यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या गुन्ह्याबाबत मंगळवार (दि. ४) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. संधू यांनी ही माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे उपस्थित होते. मध्यंतरी जालना शहरात धुम स्टाईलने महिलांचे मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने लंपास करण्याचे प्रकार वाढले होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास चक्रे फिरविली असता आदित्य सुरेश पाखरे (वय १९, रा. चंदनझिरा) असून त्याच्यासोबत अरुण दादू वाघचौरे (वय १९, रा. चंदनझिरा) व सागर रवी अंभोरे (वय २२, रा. संभाजीनगर, कांबळे गल्ली) यांनी साथीदारांच्या मदतीने सदर गुन्हे केल्याची माहिती उघड झाली. त्यानुसार पोलिसांनी आदित्य पाखरे आणि अरुण वाघचौर या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तपासादरम्यान सोन्याची अंगठी, ६५ मण्यांचे मंगळसूत्र आणि गळ्यातील सोन्याची चेन असा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हे सर्व दागिने संबंधित फिर्यादींना परत करण्यात आले आहेत.
कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा छडा या कारवाईमुळे लागला आहे. आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल असून फरार आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक संधू यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबिर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास कदीम जालना पोलीस करीत आहेत.
यांचे झाले होते दागिने लंपास....
जालना शहरासह परिसरातून मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांकडे दाखल सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात पांडुरंग शिंदे, अनिता नवगिरे (रा. मंमादेवी नगर, नूतन वसाहत), संगीता डोबाळ (रा. पार्वती अपार्टमेंट, मस्तगड), कविता देवर (रा. जमुना नगर), रमेश पांढरे (रा. घायाळ नगर) आणि अश्विनी खरात (रा. बन्सीलालनगर, रेल्वे स्टेशन) यांचा समावेश असून, त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
–—