मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेडच्या उपाध्यक्षपदी लोया, सचिव दाड

Jalna Nayak    04-Aug-2026
Total Views |
loya dad


जालना : मराठवाड्यातील व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या २०२६-२८ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल औरस येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारी सचिव श्याम लोया यांची वरिष्ठ उपाध्यक्ष, तर संजय दाड यांची सहसचिवपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे, जालना जिल्ह्यातून स्वर्गीय किशोर अग्रवाल यांच्यानंतर वरिष्ठ उपाध्यक्षपदाचा मान मिळविण्याचा बहुमान श्याम लोया यांना प्राप्त झाला आहे. तसेच चेंबरच्या अध्यक्षपदी सुरेंद्र रेदासणी आणि महासचिवपदी संदीप लाहोटी यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेच्या सर्व पदांवरील निवड एकमताने झाल्यामुळे चेंबरमधील संघटनात्मक एकोपा, परस्पर विश्वास आणि लोकशाही परंपरा पुन्हा अधोरेखित झाली. महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष मानसिंह बापू पवार, सत्यनारायण लाहोटी, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष प्रफुल्ल मालानी, तनसुखभाई झांबड तसेच मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा यांच्या मार्गदर्शनाखाली सभा पार पडली.
ॲड. कांबळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
 
व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रभावी लढा उभारणार : श्याम लोया
नवनिर्वाचित वरिष्ठ उपाध्यक्ष श्याम लोया यांनी मराठवाड्यातील व्यापारी वर्गाच्या हितासाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. व्यापारी हिताचे धोरण राबविणे, शासनाशी सातत्यपूर्ण समन्वय साधणे, व्यापाऱ्यांच्या विविध समस्या व अडचणींना प्राधान्याने न्याय मिळवून देणे, तसेच चेंबरच्या सदस्यांसाठी अधिक उपयुक्त आणि परिणामकारक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात व्यापारवृद्धीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी चेंबर कटिबद्ध राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.