संस्कार, आत्मचिंतन आणि धर्माचरणातूनच जीवनाची खरी उन्नती : निर्मलाजी

Jalna Nayak    04-Aug-2026
Total Views |

संस्कार, आत्मचिंतन आणि धर्माचरणातूनच जीवनाची खरी उन्नती :  निर्मलाजी 

जालना | प्रतिनिधी :

"मनुष्याचे वर्तमान आणि भविष्य त्याच्या संस्कारांवर, विचारांवर आणि कर्मांवर अवलंबून असते. धन, वैभव आणि पद यामुळे नव्हे, तर सत्य, संयम, करुणा आणि धर्माचरणामुळेच मनुष्य महान बनतो," असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले.

प्रवचनात त्यांनी सांगितले की, मनुष्याच्या जीवनाची पायाभरणी त्याच्या संस्कारांतून होत असते आणि संस्कारांची सुरुवात जन्मापूर्वीच गर्भावस्थेत होते. महाभारतातील अभिमन्यूचा प्रसंग याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अभिमन्यू आई सुभद्रा यांच्या गर्भात असताना श्रीकृष्णांकडून चक्रव्यूहात प्रवेश करण्याची विद्या ऐकली; मात्र त्यातून बाहेर पडण्याची पद्धत पूर्ण ऐकण्यापूर्वीच सुभद्रा निद्रिस्त झाल्या. त्यामुळे अभिमन्यूला चक्रव्यूहात प्रवेश करता आला, परंतु त्यातून बाहेर पडता आले नाही. हा प्रसंग गर्भसंस्कारांचे जीवनावर होणारे परिणाम अधोरेखित करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे गर्भवती महिलांनी सात्त्विक विचार, उत्तम साहित्य, धर्मश्रवण, सदाचार आणि सकारात्मक वातावरण यांचा स्वीकार करावा. आईचे विचार, आहार, आचरण आणि मानसिक स्थिती यांचा थेट परिणाम गर्भातील बाळाच्या संस्कारांवर होत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महासती निर्मलाजी म.सा. म्हणाल्या की, मनुष्याचे व्यक्तिमत्त्व त्याच्या विचारांवर आणि संगतीवर घडत असते. लोभ, क्रोध, अहंकार आणि हिंसा यांसारखे दुर्गुण अखेरीस व्यक्ती आणि समाजाच्या विनाशास कारणीभूत ठरतात. महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी शांतिदूत म्हणून दुर्योधनाकडे जाऊन केवळ पाच गावे देण्याचा प्रस्ताव ठेवला होता; मात्र अहंकारामुळे दुर्योधनाने तोही नाकारला. परिणामी महाभारतासारखे भीषण युद्ध झाले आणि संपूर्ण कौरव वंशाचा विनाश झाला. अहंकाराचे दुष्परिणाम किती भयंकर असतात, याचा हा मोठा धडा असल्याचे त्यांनी सांगितले.

इतिहासातील उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, जगातील सर्व संपत्ती, सत्ता आणि वैभव याच जगात राहून जाते. जगज्जेता सिकंदरनेही मृत्यूपूर्वी आपले दोन्ही हात अर्थीबाहेर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती, जेणेकरून जगाला समजावे की मनुष्य रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हातानेच निघून जातो. त्यामुळे भौतिक संपत्तीपेक्षा सद्कर्मांची संपत्ती अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी राणी पद्मिनी यांच्या त्याग, स्वाभिमान आणि धर्मनिष्ठेचा प्रेरणादायी प्रसंगही सांगितला. सतीत्व, स्वाभिमान आणि धर्मरक्षणासाठी त्यांनी जौहराचा मार्ग स्वीकारला; मात्र अधर्मापुढे कधीही झुकल्या नाहीत. त्यांचे बलिदान आजही भारतीय इतिहासात साहस, मर्यादा आणि धर्मनिष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून स्मरणात असल्याचे त्यांनी नमूद केले.

महासती निर्मलाजी म.सा. यांनी भगवान महावीरांच्या संदेशाचा उल्लेख करत सांगितले की, मनुष्याचा खरा धर्म बाह्य आडंबरात नसून अंतःकरणाच्या पावित्र्यात आहे. मनात अहंकार, ईर्ष्या, हिंसा आणि द्वेष भरलेला असेल, तर केवळ धार्मिक विधी करून आत्मकल्याण साध्य होत नाही. धर्म म्हणजे आत्मशुद्धी, सदाचार, समता आणि करुणेचा स्वीकार होय.

 

प्रवचनाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, प्रत्येकाने दररोज आत्मपरीक्षण
dharmaकरून आपल्या जीवनात दैवी गुण वाढवावेत आणि आसुरी प्रवृत्तींपासून दूर राहावे. सत्य, करुणा, क्षमा, संयम, सेवा आणि मानवता या मूल्यांचा अंगीकार केल्यास व्यक्तीचे जीवन यशस्वी होते आणि समाजातही शांतता, सद्भावना व नैतिकतेची जपणूक होते. धर्माचा खरा सार बाह्य दिखाऊपणात नसून श्रेष्ठ विचार आणि श्रेष्ठ आचरणात आहे. हाच खरा धर्म असून, हाच मनुष्यजीवनाच्या यशाचा आणि आत्मकल्याणाचा सर्वोत्तम मार्ग आहे.

या धर्मसभेला गुरुणीमैया महासाध्वी कौशल्याजी म.सा. 'श्रमणी' यांच्या प्रशिष्य तथा स्वर्ण संयमज्योती उपप्रवर्तिनी महासती प्रमिलाजी म.सा. यांच्या सुशिष्य तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा., तपचंद्रिका महासती नंदिनीजी म.सा., महासती उपमाजी म.सा., महासती उपासनाजी म.सा. तसेच महासती ऋषिताजी म.सा. (आदि ठाणा ५) यांची पावन उपस्थिती लाभली. मोठ्या संख्येने श्रावक-श्राविकांनी धर्मश्रवणाचा लाभ घेतला.