
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलेली भावना त्यांच्याच शब्दात:
जिल्ह्याच्या विकासासाठी माध्यमांची रोखठोक भूमिका नेत्यांना रुचेल काय?
जालना : दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या कार्यालयातून जवळपास सर्वच प्रमुख्य माध्यमांच्या प्रतिनिधींचे मोबाईल खणखणले... आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले. सर्वजण दादांच्या अनौपचारिक पत्र परिषदेसाठी लगबगीने त्यांच्या जालन्यातील भोकरदन नाक्यावरील निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळी दादा म्हणाले की, 'आज मी काहीच सांगणार नाही... तुम्हीच बोला.' त्यांनी चेंडू पत्रकारांकडे टोलविला होता. प्रारंभी इकडच्या तिकडच्या गप्पा रंगत गेल्या आणि जालन्यातील महापालिकेच्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पाचा विषय निघाला. 'ही संकल्पना माझीच असताना अन्य नेते कसे काय श्रेय घेतात हेच मला उमगत नसल्याचे सांगून त्यांनी पत्रकारांसमोर दिशा समितीचे इतिवृत्तच ठेवले आणि 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' हे दाखवून दिले. एवढ्यावरच दादा थांबले नाहीत, तर त्यांनी 'जोपर्यंत माध्यमे हे सर्वपक्षीय नेत्यांना ठोकत नाहीत, म्हणजेच रोखठोक भूमिका घेत नाहीत, तोपर्यंत जिल्ह्याचा विकास होणार नाही, हेही सांगून टाकले आणि एकच हशा पिकला.